अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’ काय होते? ते आजही लागू होतं का? भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला होता.
अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’ काय होते? प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते वैज्ञानिक बनले. डीआरडीओ, इस्रो अशा संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केलं. भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आणि उपग्रह त्यांच्याच नेतृत्वात बनले. ते संरक्षण मंत्र्यांचे सल्लागारही होते. 1999 ते 2001 भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार बनले.
अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’ काय होते? पुढील काळात ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला उभे राहिले आणि भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 30 हून अधिक पुस्तकं लिहिली
अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’ काय होते?
अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’ काय होते? अब्दुल कलाम यांनी आपल्या कारकीर्दीत वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. त्यांना सर्वांत अधिक आवडायचं ते तरुणांमध्ये मिसळणं. त्यांचे विचार ऐकून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं. भविष्यातला भारत कसा असेल यांचं एक ‘व्हिजन’ त्यांच्याकडे होतं आणि हे व्हिजन तरुणाईने आत्मसात करावं असं त्यांना वाटायचं.
तरुणाईच्या जोरावर 2020 मध्ये भारत हा केवळ प्रगतीशील देश राहणार नाही तर एक विकसित देश होईल असं त्यांचा दृष्टिकोन होता. 2020मधला भारत कसा असेल याबाबतचे त्यांचे विचार त्यांनी आपल्या ‘इंडिया 2020: व्हिजन फॉर न्यू मिलेनियम’ या पुस्तकात मांडले आहेत.
अब्दुल कलाम यांनी ज्या गोष्टींचा अंदाज वर्तवला होता त्यापैकी अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत पण त्याच बरोबर आणखी भारताला विकसित देशांच्या यादीत झळकण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे हे देखील तितकेच खरे आहे.
व्हिजन 2020 कसं तयार झालं?
टेक्नोलॉजी इन्फर्मेशन, फोरकास्टिंग अॅंड असेसमेंट काऊन्सिल (TIFAC) ही सरकारची संस्था काही ठराविक कालावधीनंतर संपूर्ण देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत असते. येणाऱ्या काळात देशासमोरील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण आज तंत्रज्ञानाच्या दृष्टीने काय पावलं उचलली गेली पाहिजे हे सांगण्याचं काम ही संस्था करते.
अब्दुल कलाम 1996 मध्ये या संस्थेचे अध्यक्ष होते. 1996-97 साली अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली व्हिजन 2020 डॉक्युमेंट तयार करण्यात आलं होतं.
लाईन
2020मध्ये या भारतासमोर नेमकं कोणतं उद्दिष्ट असायला हवं याचा अहवाल त्यांनी सादर केला होता. त्या अहवालाला आधारभूत धरून अब्दुल कलाम यांनी तंत्रज्ञान, विज्ञान, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रासाठी भारताचं व्हिजन काय असायला हवं आणि त्यादृष्टीने सामान्य माणसाने कोणती पावले उचलली पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन केले आहे.
व्हिजन 2020 काय आहे?
अब्दुल कलाम म्हणतात, “आपल्या देशात दरवर्षी 2 कोटी बालकं जन्माला येतात. या बालकांचं भविष्य काय असेल? त्यांच्या समोर काय उद्दिष्ट असलं पाहिजे? त्यांच्यासाठी आपण काही पावलं उचलावीत की त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून फक्त उच्च वर्गाचंच कसं भलं होईल हे पाहावं.”
“मार्केट ड्रिव्हन स्ट्रॅटेजी किंवा स्पर्धेचं युग असे शब्द वापरून त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं की पुढील दोन दशकांसाठी एखादी योजना आखून ती राबवायची?” असा सवाल ते करतात.
1998 साली लिहिलेल्या या पुस्तकात अब्दुल कलाम सांगतात, “1998 शेकडो तज्ज्ञांशी बोलल्यावर आणि अनेक अहवालांचा अभ्यास केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपण 2020 मध्ये विकसित राष्ट्र होऊ शकतो.
“भारताचे लोक गरिबीवर मात करतील, देशाच्या प्रगतीसाठी अधिक कार्यक्षमतेने काम करतील आपली आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था बळकट होईल. हे केवळ स्वप्नच नाही तर आपल्या सर्वांसाठी उद्दिष्टच आहे,”असं अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं.
व्हिजन डॉक्युमेंटमध्ये असलेली भाकितं…
भारत 2020 मध्ये जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये असेल आणि भारताचं दरडोई उत्पन्न हे 1540 डॉलर्स इतकं असेल भारताची, लोकसंख्या 1.4 अब्ज इतकी असेल, तसेच पूर्ण जगातल्या जीडीपीच्या 4.07 टक्के हिस्सा भारताचा असेल, असं भाकित त्यांनी केलं होतं. भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.
अब्दुल कलामफोटो स्रोत,GETTY IMAGES
2019 मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न हे 2000 डॉलर्सहून अधिक होतं. वर्ल्ड बॅंकेनुसार भारताची लोकसंख्या 1.35 अब्ज इतकी आहे आणि भारताचा जागतिक जीडीपीतील एकूण हिस्सा 3.3 टक्के इतका आहे.
1991 च्या जनगणनेनुसार भारताचं साक्षरतेचं प्रमाण 52 टक्के आहे. तंत्रज्ञान आणि भारतीय लोकांचे प्रयत्न यामुळे वर्षांत भारताचं साक्षरतेचं प्रमाण 2020मध्ये 80 टक्के होईल, असं कलाम यांनी म्हटलं होतं. नॅशनल स्टॅटेस्टिकल ऑफिसनुसार सध्या भारतातलं साक्षरतेचं प्रमाण हे 77.7 टक्के इतकं आहे.
सर्वांना समान संधी मिळणे आवश्यक
TIFAC च्या अहवालाचा भर प्रामुख्याने हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आहे. असं असलं तरी अब्दुल कलाम यांनी कुठलाही समाजघटक बाहेर राहणार नाही या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे नवीन संधी उपलब्ध होतील पण त्या केवळ एकाच वर्गाला मिळता कामा नये. अन्यथा त्यामुळे संघर्ष आणि भेदभावाला थारा मिळेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“आपल्या देशाची शक्ती ही इथे असलेल्या साधन संपत्ती आणि लोकांपासूनच तयार झालेली आहे. तंत्रज्ञानाच्या व्हीजनचा फायदा जास्तीत जास्त लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी होणं गरजेचं आहे,” असं कलामांनी म्हटलं आहे.
जीडीपी, फॉरेन एक्सचेंज, आयात-निर्यात, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि आहाराकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे असं त्यांनी अधोरेखित केलं आहे.
2020 नंतर काय करायचं?
2015 साली अब्दुल कलाम यांनी ‘Beyond 2020’ हे पुस्तक लिहिलं. 2020 ला पाच वर्षं बाकी असताना व्हिजन 2020 नुसार आपण कुठे आहोत हे सांगितलं होतं. आर्थिक उदारीकरणानंतर व्हिजन 2020 मध्ये निर्धारित करण्यात आलेली उद्दिष्टे आपण पूर्ण करू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं.
पण व्हिजन 2020 मध्ये जो जीडीपीबाबतचा केला होता त्या आकड्यांचा आणि सध्याच्या परिस्थितीचा मेळ बसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्याच बरोबर कृषी आणि उत्पादन क्षेत्राबाबत त्यांनी चिंता पण व्यक्त केली होती.
1995 च्या तुलनेत 2015 मध्ये कृषी क्षेत्राची प्रगती झाली आहे पण याहून आधिक चांगली कामगिरी करता येऊ शकते आणि शेतमजूर-शेतकरी जास्त उत्पन्न मिळवून श्रीमंत होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं.
‘उद्दिष्ट गाठलं तरी थांबायचं नाही’
उद्दिष्ट गाठलं तरी आपण थांबायची गरज नाही असं कलाम म्हणायचे.
“देशातील लोकांचं भलं व्हावं हे अनंत काळासाठी आपलं ध्येय असावं. ज्या तरुणांकडे ज्ञान, कौशल्य आणि प्रज्वलित मन आहे तेच लोक केवळ दीर्घकालीन ध्येय ठेऊन त्याचा पाठलाग करू शकतात.
“अशा अवस्थेला पोहोचण्यासाठी आपण एकमेकांचं सहाय्य करू शकतो. त्यासाठी आपण आपल्या उद्दिष्टांवरून ढळता कामा नये तसेच वेळोवेळी होणाऱ्या परिवर्तनाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे याकडेही लक्ष पुरवायला हवं,” असं कलाम यांना म्हटलंय.
देशाला विकसित बनवण्यासाठी मी एकटाच काय करू शकतो असा विचार कधीही करू नका. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुमची कार्यक्षमता वाढवा सर्वांच्याच प्रयत्नांनी भारत विकसित देश होईल, असा विश्वास कलामांना होता.
विकसित भारत म्हणजे आपण जगभरातल्या पाच सर्वांत मोठ्या अर्थसत्तांपैकी एक असू, संरक्षणाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असू, कृषी, उत्पादन, सेवा क्षेत्रात या आघाड्यांवर भारत सक्षम असेल त्याच बरोबर विकसित कौशल्य असलेला रोजगार आपण निर्माण करू शकू या सर्व गोष्टी विकसित राष्ट्रात अंतर्भूत असायला हव्यात.
भारत स्वतंत्र होण्याआधी भारताचे लोक ज्या तत्परतेनी आणि समर्पणभावाने झटले अगदी त्याच प्रमाणे आपण आपला देश विकसित करायचा आहे हे उद्दिष्ट ठेवलं तर ते नक्कीच आपण गाठू शकतो असं कलाम यांनी आपल्या व्हिजन 2020 मध्ये म्हटलं आहे.
(संदर्भ – India 2020 – A vision for new millennium, Beyond 2020 – APJ Abdul Kalam with YS Rajan, Website – abdulkalam.com, tifac.org.in )